अल्प चरित्र

|| राष्ट्रधर्म प्रणेते ||

श्री महाराजांचे हे अल्प चरित्र यथामाती आपणापुढे सदर करत आहे.
देव भूमी,संत भूमी आणि वीरभद्रांची पवित्र भूमी. शालिवाहन, यादव, राजपूत येथेच झाले. ज्ञानदेव, एकनाथ, समर्थ रामदास, संत गजानन महाराज याच भूमीत नांदले. अशा या पुण्य पावन भूमीवरती श्री नृसिंह पाचलेगांवकर महाराज यांच्या रुपाने काल प्रयोजनानुसार ही विभूती जगाच्या कल्याणासाठी अवतरली. श्री राजारामपंत कुळकर्णी आणि सौ. कृष्णाबाई उर्फ भागाबाई या भगवत भक्त दाम्पत्या पोटी शके १८३४ अश्विन कृष्ण चातुर्दीशी (१४) दिनांक ८/११/१९१२ या मंगल प्रभाती पाचलेगावी (ता. जिंतूर जि. परभणी, महाराष्ट्र) जन्म झाला. या दिवाळीच्या नरक चातुर्दीशीच्या दिवशी या भूमीवरील असुरांचा नाश करण्यासाठी ही मूर्त रुपाने दिव्य शक्ती अवतरली. हिंदू संस्कृती प्रमाणे नामकरण संस्कार होवून ‘नृसिंह’ असे श्रींचे नांव ठेवण्यात आले.
बाळ काही महिन्यांचे असेल, दत्त वाडी येथील तपस्वी श्री. माधवाश्रम स्वामी पाचलेगावी आले. यांनी अतींद्रिय शक्तीद्वारे नृसिंहाच्या कार्याची कल्पना देवून ‘संचारेश्वर’ असे संबोधून स्वामी पाचलेगावाहून परतले.
नृसिंह ही खोडकर मूर्ती आवरता आवरेना पण, ना भगवंताचा फार लळा असून पुराण, भजन इ. आवड मनातून असे. श्री आपल्या विविध जातींच्या मित्रांसोबत नरु, अप्पा, पावश्या धोंडू आदि. यांना दुध पाजल्याशिवाय स्वतः दुध पीत नसत. वडिलांनी शाळेत घातले पण श्रींचे मन रमेना. श्री कसे तरी निसटून गावाजवळील मुक्तेश्वर या स्वयंभू पिंडीजवळ आपल्या सवंगड्या सोबत जात.
बालपणापासूनच श्रींना दुर्जनांची फार चीड होती. गावात काही लोकांना शिंदी (दारू) पिण्याचे व्यसन जडले होते. त्या शिंदीच्या मडक्यामध्ये माती मिसळून त्यांना श्रींनी चांगलाच उपवास घडवला. महाराज अंगावर लंगोटी घालत. बळेच त्यांना कपडे घातलेच तर ते कपडे भिजवून टाकत किंवा जाळूनही टाकत. गावातील लोकांच्या मनामध्ये श्रीं विषयी फारच आदर असे. श्रींचे कौतुक करत. त्यांना अंगा-खांद्यावर घेवून फिरत असत.
संतच ते समाज उद्धार यासाठीच आलेले होते. श्रींच्या ८व्या वर्षाची गोष्ट आहे. श्रींची आई नागपंचमीच्या दिवशी प्रती वर्षाप्रमाणे मातीच्या नागाची पूजा करण्यास बसली असताना श्रींनी खरा नाग आणून देवू का? असे विचारले असता, आईने आण असे सहज म्हटले. तर काय? श्रींनी खरच खरोखरीच नाग आणून समोर ठेवला पण! पुजावा कोण करणार? घाबरून सर्व पळाले. मात्र श्रींनी स्वतःच नागाची पूजा केली. त्यावेळ पासून महाराज सर्पधारी झाले. त्यांच्या इच्छेनुसार शिव पुजेवेळी पिंडीवर नाग पूजेसाठी ठेवत असत. ज्योर्तिलिंग औंढा नागनाथ, ओंकारेश्वर आदी ठिकाणी अशी पूजा करतेवेळेस श्रींना अनेकजणांनी त्यावेळी पहिले आहे. बालपणाचे सर्पधारण केलेले श्रींचे छायाचित्र आजही उपलब्ध आहे. या काळातच महाराजांना माधवाश्रम स्वामींनी पाचलेगावी संस्कार करून त्यांना श्री नृसिंह स्वरस्वती यांचा अनुग्रह प्राप्त करून दिला. श्री त्यावेळपासून अधिविरागी झाले.
महाराजांच्या घरी चुलत बंधूच्या मौन्जेचा विषय निघाला असता. त्यातच नृसिंहाचे लग्नासाठी सोयरीक ठरली. त्याच दिवशी श्रींना भक्तीत रममाण असतेवेळी एक दृष्टांत झाला. तो त्यांनी घरी येवून आस सांगितला, “माझे लग्न होणार नही, पण आज दुपारी आगीचा डोंब उसळून त्यात हे घर जळणार व आजी त्यातच राख होणार.” हे एकूणच सार्वजन चिडले व श्रींना दूषण तेवू लागले. पण व्हायचे ते झाले. याच घराचे भस्म अंगास चर्चून श्री घराबाहेर पडले ते कायमचे! त्यानंतर महाराजांनी औंढा, लोणार या ठिकाणी तपश्चर्या केली. नंतर लवकरच ‘श्री’ बाबा, छोटे महाराज व पाचलेगांवकर महारज आदी नावांनी प्रसिद्ध झाले. ‘सर्वभूत हिते रतः’ यानुसार महाराजांनी एक व्यापक राष्ट्रीय जीवनास स्वीकारले. देशपर्यटन करून विश्व कल्याण साधने. हे ब्रीद धरून अन्याया विरुद्ध लढा देण्यास श्री सज्ज झाले.
त्य वेळची परिस्तिथी पाहता मात्रभूमीस ब्रिटीश, मुस्लीम दास्यीयातून मुक्त करण्यास जन संघटीत करण्यासाठी महाराज समाजात मिसळले. ही बालमूर्ती पाहून लोक जमू लागले. प्रभावाने श्रीं जवळ वावरू लागले. श्रींनी पाचलेगावी एक यज्ञाची (रुद्रस्वाहाकार) इच्छा प्रगट करताच लोकांनी स्फूर्तीने पाच दिवसाचा यज्ञ पूर्ण केला. या मध्ये श्रींनी राष्ट्रधर्माचे विचार व मानसिक रोग  निवारण्याचे कार्य मोठ्या प्रमाणावर केले. श्रींचे वय किती? तर फक्त १३ वर्षांची बालमूर्ती होती.
सर्वत्र श्रींची किर्तीच कीर्ती झाली. त्यावेळी ही भूमी निजामाच्या अधिपत्याखाली होती. श्रींची कीर्ती ऐकूण तेथील जहागीरदार श्री. शिवराम बहादूर यां बरोबर श्रींना हैदराबाद मध्ये नेण्यासाठी निजामाने पैसा व दागिना देवून काही मंडळी श्रींकडे पाठविली. श्रींनी ती संपत्ती गोर गरिबांना वाटली आणि श्री फिरत फिरत हैदराबादेत गेले. श्रींचे बालरूप तेथील मोठ्या मोठ्या लोकांना व खुद्द निजाम यास प्रभावित करत होते. महाराजांची अद्भूत शक्ती पाहून निजामाने महाराजांना करोडगीरी (एक प्रकारचा कर) माफ केली. रेल्वे प्रवास मोफत आणि दोन पोलीस कॉन्स्टेबल सोबत अशा सनदा दिल्या. यातील काही कागद आश्रमामध्ये आजूनही आहेत.
धर्म व लोक जाग्रतीसाठी श्रींनी पाचलेगाव ते लोणी असा पालखी सोहळा त्यावेळी सुरु केला होता. श्रींनी देश परिस्तिथीचे निरीक्षण केले. देशात धर्म, अर्थ, जाती यांची टोकांची विषमता जागो जागी दिसली. धर्मांतरण, अत्याचार व लुबाडणूक इत्यादींचा बिमोड करण्यासाठी व त्याकाळीच्या या घटना पाहून श्रींनी हळहळून प्रतीज्ञा केली की, “मी इतःपर देशाच्या स्वातंत्र्यासाठी व याद्वारे सर्व मानव कल्याण म्हणजे अभ्युदय, निःश्रेयस स्वावलंबी धर्माच्या रक्षणासाठी व अन्याय प्रतिकारक बल निर्माण करण्यासाठी हा देह अधीक संपन्न करून झिजवीन.
श्रींनी बोरी या मराठवाड्यातील गावी एक सप्ताह घेतला. श्री हनुमंताची मूर्ती स्थापली. जणांमध्ये शक्ती, बुद्धी व भक्ती यांची जोपासना व्हावी. तसेच एकता निर्माण करण्यासाठी हा सप्ताह केला होता. कळमनुरी (जि. हिंगोली) येथे डिसेंबर १९२६ साली स्वाहाकार घेतला. त्यासाठी दीड लाख लोक तेथे जमले होते. गाडगेबाबा, दासगणू महाराज आदी संत व जगतगुरु शंकराचार्य श्री विद्द्याशंकर भारती त्यावेळचे प्रसिद्ध कीर्तन व प्रवचनकार ही जमले होते. फक्त यज्ञकुंडासाठी तीनशे ब्राम्हण काम करत होते. सर्व धर्माचे लोक प्रसादासाठी येवून जात व धन्यता मनात. या यज्ञामध्ये जगतगुरूंनी स्वतःची शाल देवून ‘धर्मभास्कर’ या पदवीने श्रींचा गौरव केला. यज्ञामध्ये उरलेले सर्व धन धान्य श्रींनी गरिबांना वाटले व स्वतः फकीर राहिले. यावरून श्रींची निस्पृह वृत्ती स्पष्ट दिसते.
याच यज्ञाच्या समाप्ती वेळी एका बातमीने श्रींना चिंतीत केले. ती बातमी, ‘दिल्ली येथे श्री श्रद्धानंदांचा अब्दुल रशिदने दिवसा खून केला”. अन्यायाची आग श्रींना आतून जळू लागली. कुराणाचा अभ्यास केला. मुस्लीम मनोवृत्ती अभ्यासली व इतर इतिहासकरांचे मतही अभ्यासले. महाराजांनी सर्वाना छत्रपती शिवाजी महाराज, गुरु गोविंदसिंग यांचा आदर्श ठेवून वागण्यास सांगितले. राष्ट्रनिष्ठा हेच पाहिले जाईल असे ठरवून श्री कार्यास लागले.
बेधडक निजामा विरुद्ध प्रचार केला. “वीरता हीच अस्मिता” असे ब्रीद प्रचारित केले. ठिकठिकाणी दले, व्यायामशाळा काढल्या. एक एक महिन्यात चाळीस हजार ते एक लाख लोक जागृती श्रींनी केली. धर्मांतराचे छडयंत्र बंद झाले. हैदराबादेस किंग कोठीवर झालेले जहाल व्याख्यान निजामाला चांगले झोंबले. सी. आय. डी. चे जाळे निजामाने पसरविले पण सी. आय. डी. व्याख्यान लिहायचे विसरून ते एकण्यात गुंग होत हे पाहून निजाम अधिक चिडला.
ज्या हिंदुना छळाने मुसलमान बनविले त्यांना स्वधर्मात व हिंदुतील जाती विषमता दूर करण्यासाठी विराट हिंदू परिषद घेण्याचे श्रींनी ठरविले. १ व २ जून १९२८ रोजी डॉ. मुंजे यांच्या अध्यक्षतेखाली देऊळगावराजा येथे परिषद घेतली. उपस्तिथी - लोकनायक बापूजी आणे, दाजीशास्त्री चांदेकर इ. पुरोहितांनी ‘अहं ब्रम्हास्मि’ या तत्वाने अस्पृश्यता ही धर्म बाह्य ठरविण्यात आली. श्री आबासाहेब गीरोलीकार महाराज यांच्या हस्ते शास्त्रोक्त पद्धतीने धर्मांतरित झालेल्यांना स्वधर्मात घेतले.
निजामाने श्रींची धर्मनिष्ठा मारून टाकण्यासाठी श्रींना दरमहा ८०० रुपये व निजाम सत्तेचे पाठबळ देण्याचे आमिष दाखविले. फक्त मौन धरून करून श्रींनी राहावे ही अट घातली पण महाराजांना स्वतःची संपत्ती करायची नव्हती. तर अन्याय विरुद्ध लढायचे होते. यासाठी कित्येकांनी महाराजांची मुर्खात गणना केली होती. श्रींनी निजामाचे न ऐकल्याने त्यांना २० वर्षाकरिता निजाम स्टेट मधून १९२८ अखेरीस हद्दपार केले.
श्रींची भगवंतावरील निष्ठा ही द्रुढ असल्याने त्यांना अमोघ विपत्तीत साथ देणारे कार्यकर्ते लाभले. यामुळे इतर लोकही श्रींच्या सहकार्याने निजामाविरोधात धीट होऊ लागले. महाराजांनी कार्याची रूपरेषा आखली.
भारतीय राष्ट्रनिष्ठेला जे स्वतःची निष्ठा मानतील ते माझे अशी धारणाकरून कार्याची त्रिसूत्री काढली.
१)      देशाच्या स्वातंत्र्यासाठी व उन्नतीसाठी अन्याय प्रतिकार नि न्याय रक्षक अशी कर्तृत्वशाली जनशक्ती जाग्रत करणे.
२)      एका कार्यक्षम बलवान जनशक्तीला योग्य वळण देणे.
३)      अराष्ट्रीय वृत्तीने भरलेल्या लोकांचे संख्याबळ शुद्दीच्या द्वारे पार घटवून संभाव्य संकटाच्या खाईतून देशाला वाचविणे.
यासाठी श्रींनी मुक्तेश्वर दलाचे जाळे विणले व सेवकांच्या मदतीने शुद्धीचे सत्र सुरु केले. तरुण भारत चे वार्ताहर श्री अण्णासाहेब पार्डीकर यांचे वडील श्री दादासाहेबनी स्वतः महाराजांच्या कार्यात भाग घेतला होता. श्रींनी भगवान शंकराचे तीर्थ देवून, लहाडीवरून चालवून (विस्तवावरून) शुद्धीकरण केले.
      १९२९ च्या सुमारास पं. मोतीलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली तयार झालेल्या भारतातील प्रमुख पक्षीय रिपोर्टचा प्रचार करून कमिशन विरुद्ध लोकांत असंतोष निर्माण केला. त्यातच सावरकरांच्या मुक्ततेसाठी ठराव पास केला.
      इ.स. १९२९ च्या हिंदू महासभेच्या वार्षिक प्रतीव्रत्तात हा मजकूर आला आहे. “सावरकरांची भेट घेण्याचा फार दिवसांचा हेतू व गणपती उत्सव या साठीच्या सावरकरांनी केलेले आग्रहाचे आमंत्रण म्हणून श्री पाचलेगावकर महाराज रत्नागिरीस आले.” ११/०९/१९२९ रोजी श्रींच्या अध्यक्षतेखाली सावरकरांचे व्याख्यान झाले व नंतर महाराजांचे व्याख्यान होवून सर्व जातींसाठी पतित पावन मंदिर प्रवेशासाठी खुले झाले. १२/०९/१९२९ त्याच ठिकाणी हिंदू महासभेच्या वतीने श्री रानडे यांच्या हस्ते महाराजांना मानपत्र अर्पण केले. तेथे श्रींचे दीड तास व्याख्यान झाले.
श्रींनी नागपूर ते कुरुंदवाडी तसेच मुंबई ते हैदराबाद दौरे केले. संगमनेर, घाटंजी, वरोडा, वणी, मंगरूळ, जुन्नर, बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, अहमदनगर, वाशीम, अकोला आदी ठिकाणी व्यायामशाळा व मुक्तेश्वर दल यांच्या दीडशे शाखा स्थापन केल्या. महाराज अशा आविर्भावाने सूर्यनमस्कार घालत की पाहणारे आश्चर्य चकीत होत.
१९३०-३२ सालच्या कायदेभंगाच्या चळवळीत श्रींच्या प्रचारामुळे संघटनेतील व बाहेरील दीड हजाराहून अधिक लोकांनी भाग घेतला.
      निजाम व व्हाइसरॉय लॉर्ड वेलिंग्टन या दोघांच्या हुकुमानुसार श्रींना पकडण्यासाठी वारंट काढला गेला. हे श्रींना कळताच श्री भूमिगत झाले. ते लपत छपत फ्रेंच स्टेट पोन्डिचेरी येथे ५ महिने राहिले. नंतर सर्वांच्या नजरा चुकवत वर्धा येथे प्रमुख वकील मंडळींची बैठक होवून महाराज तेथून चान्द्याला गेले.
      बाबासाहेब देशमुख (एम. एल. ए.) यांच्याकडे गुप्त पद्धतीने थांबले होते व महाराजांची  काही भक्तांनी दीड वर्षासाठी जमानात घेतली त्यामुळे वारंट काढण्यात आला. श्री ब्रिटीश राज्याचे सभासात होण्यासाठी स्वतःच्या मालकीचे स्थान असणे आवश्य होते म्हणून भक्तांनी मिळून खामगावी इमारत बांधली. १९३४ साली मुक्तेश्वर आश्रम खामगाव येथे महोत्सव होवून तेथील दोन्ही आश्रमात भगवान शंकराची स्थापना केली.
३१ मे १९३९ महाराज गुहागर येथील श्री गोविंदराव भावे यांना दत्तक जावून ब्रिटीश राज्याचे नागरिक झाले.
      श्रींनी स्थापलेली मुक्तेश्वर दले पुन्हा नव्याने चालू करण्याचा विचार श्रींचा चालू होता. संर संघ चालक डॉ. हेडगेवार व तरुण सभा या संस्थेचे चालक बाबाराव सावरकर या दोघांनी श्रींना विनंती केली की, आपले मुक्तेश्वर दल व तरुण सभा एकत्र करून राष्ट्रव्यापी संस्था उभारू. महाराजांनी त्यांना शुद्धीकारण करत असाल तरच या एकत्रीकरणासाठी मी तयार आहे. मला संस्थानिश्ठेपेक्षा राष्ट्रनिष्ठा महत्वाची आहे. असे सांगून होकार मिळताच सर्वदल एका  ध्वजा खाली झाले.
      ३१/०७/१९३५ श्रींची व महात्मा गांधी यांची मागणवाडी (वर्धा) येथे पहिली भेट.
त्यावेळेस राजकीय व तात्विक प्रश्नावर इतर सहकाऱ्यां बरोबर पाऊन तास तर चर्चा झाली. श्री म्हणाले “शस्त्र धारण करण्यास मान्यता असावी. साधन शुद्ध्तेपेक्षा हेतू शुद्धतेवर भर द्यावा हा आपल्या पूर्वजांचा आदर्श तरुणांसमोर ठेवावा”.
०४/०८/१९३५ पुन्हा तेथेच नागपंचमी निमित्त भेट झाली. यावेळी गांधीनी कुतूहलाने सापांविषयी सव्वातास चर्चा केली.
उपस्थिती - जमनालाल बजाज, डॉ. राजेंद्र प्रसाद, सरदार पटेल ई.
      सरदार पटेल श्रींना म्हणाले होते, “महाराज दुष्ट मनसे आपल्या समाजात पण आहेत. त्यांचा प्रतिकार करणे इष्ट की नाही तेंव्हा श्री म्हणाले
“दुष्ट हिंदू असो की सख्खा मामा कंस व स्वतःचा बाप हिरण्याकश्यपू असो त्याची गय न करणे हा पुर्वजणांचा कित्ता गिरवला पाहिजे ”
      १९३५ पर्यंत महाराज जमानातीवर असल्याने कसे तरी स्वस्थ राहिले पण १९३५ आखेर त्यांनी
      “हुकुम सरकार क है, फिर्याद जबानी रुक जाए|
दिल की बहती हुई गंगा की रवानी रुक जाए |
कोम काति है हवा बंद हो पाणी रुक जाए|
पर ये मुमकीन ही नही की जोश ए जबानी रुक जाए||”
असे महाराजांनी सरकारला बजावले.
      १९३६ ते ४० पर्यंत दक्षिणेत संकेश्वर ते मुंबई आणि वर विदर्भ मध्यप्रदेश, पंजाब, जम्मू काश्मीर, दिल्ली इ. ठिकाणी जनजागृती केली.
      १८व्या आर्या समाजाच्यावर्षीक उत्सवात संपूर्ण भारतातून जमलेल्या आर्या व सनातनी हिंदू पुढाऱ्यांनी श्रींचे मनःपूर्व सत्कार केले व श्रींचे खणखणीत अध्यक्षीय व्याख्यान झाले. पंजाबात हजारो शिन्श्यात मेळाव्यात श्रींचे अनेक ठिकाणी भाषण होवून गुरुद्वाऱ्या कडून सत्कार झाले. हिंदू विद्यापीठ बनारस येथे टिळक पुण्यतिथी निमित्त ‘धर्म व बुद्धिनिष्ठ’ या विषयावर उत्स्फूर्त भाषण झाले.
      २१/०१/१९३८ किर्लोस्कर वाडी येथे व्याख्यान झाले. त्यावेळी किर्लोस्कर म्हणाले “आम्हाला बुवाशाही विध्वंसक संघा एवजी सहाय्यक मंडळ स्थापावे लागेल”.
      याच काळात औंध संस्थानात श्रींनी ग्रामरक्षण दले स्थापन केली. या दलाची तयारी पाहून व्हाइसरॉयचे मिलिटरी सेक्रेटरी थक्क झाले.
      १४/०३/१९३८ दादर येथे हिंदू संघटनेचे तत्वाज्ञान या विषयावर सावरकरांच्या अध्यक्षतेखाली भाषण झाले. अशाच सभांमधून लोकसंख्येनुसार प्रतिनिधित्व मिळण्यासाठी श्रींनी जनजागृती केली. या काळातच नांद्रे(मिरज) येथील इसाईकारण थांबव्ण्यापासून ते शुद्धीकरनापर्यंत हजारो लोकांचे मेळावे घेतले.
      श्रींनी संघ व हिंदु महासभेच्या शेकडो शाखा संस्थापन केल्या.
१९३८ ते ३९ हिंदू सभा व आर्य समाज यांच्या वतीने भागानगर येथे धार्मिक हक्क व नागरी तत्वाचे हक्क मिळण्यासाठी या सत्यग्रहात श्रींनी धर्मयुद्ध म्हणून जनतेत नवचैतन्य निर्माण केले.
      २६/०५/१९३९ दादर येथे श्रींच्या अध्यक्षतेसाली सत्याग्रहींचा जाहीर सत्कार करण्यात आला. श्रींनी हिंदी राष्ट्रभाषा व्हावी म्हणूनही लोकमत जागृत केले.
      १९४० पासून व्याख्यानात पाकिस्तान या योजने विरोधात भाषणे केली.
      १५/०४/१९४० पुणे येथे संघांच्या ८०० अधिकारांच्या ४० दिवसाच्या कॅम्पाचा समारोप श्रींच्या अध्यक्षेत झाला.
      ३०/०५/१९४० पुणे येथे शनिवारवाड्या पुढे पंचवीस हजार लोकांच्या सभेत श्री अध्यक्ष होते व सावरकर व्याख्याते होते. सावरकरांनी केलेल्या लष्कर भरती आव्हानास श्रींनी उचलून धरले. १९४४-४५ पर्यंत सैनिकीकरणाचा प्रचार केला.
      संघाचे धोरण बदलण्याने श्रींनी शस्त्रासाठी बंदी नसलेल्या जातींना (राजपूत, जाट इ.) शस्त्र सज्ज करून. मे १९४१ मध्ये ग्वाल्हेरला  हिंदुराष्ट्र सेना स्थापन केली. स्पृश्य अश्पृश्यांबरोबर सहभोजने, हिंदू संघटन देवाची (शिवाजी महाराज) मिरवणूक काढल्या जाई.
      ०१/०६/१९४३ ग्वाल्हेर येथे सेनेच्या कॅम्पात घोषणा केली की,
 “आम्ही देशाचे स्वातंत्र्य, धर्माचे रक्षण व अखिल विश्वाच्या कल्याणासाठी सैनिकांची बलाढ्य व अभेद्य संघटना उभारू इच्छितो”
 १९४६ साल आखेर पर्यंत अहोरात्र झटून दिल्ली, भोपाळ, मध्यप्रांत, वऱ्हाड, महाराष्ट्र, सांगली संस्थान, कोकण, मुंबई, पुणे, ई. स्थानातील मिळून १२००० पेक्षा जास्त सैनिकांची सेना उभारली.
      १९४२ साली खामगावी संघटन महायज्ञ घेतला. एक ते सव्वा लाख जनता तेथे जमली होती. हीच जनता पुढे ४२ च्या आंदोलनात सामील झाली होती. उपस्थिती - सावरकर, श्री. नलवडे, श्री. शिंदे इ.
      ख्रिश्चनांनी अनेक प्रकारे धर्मांतर केलेल्या लोकांना मांडला व जबलपूर जिल्ह्यात प्रचार करून १२०० गावातील हजारो लोकांत प्रचार करून इसाई करण्याच्या प्रसाराची लाट थोपवली. तेथे अनेक लोकांना स्वधर्मात घेतले. विशेषतः मिशनर्यांचा उजवा हात असलेला फॉनवेल यास सहकुटुंब शुध्द करून घेतले.
 तेथेच एक शाळा स्थापन करून फॉनवेल यास श्रींनी शिक्षक म्हणून तेथे नियुक्त केले.        बऱ्हाणपूर येथे मुस्लीम सत्पंथ (पिरणा पंथ) यांनी बाटवलेल्या अनेकांना स्वधर्मात घेण्यासाठी २२ ते २४ मार्च १९४५ रोजी एक संगठन यज्ञ घेतला. यासाठी एक लाखावून अधीक लोक उपस्थित होते. १५० कुटुंबांना स्वधर्मात घेतले. जगद्गुरू सावरकर, भाई परमानंद, श्यामाप्रसाद मुखर्जी, जुगलकिशोर बिर्ला, अनेकांचे शुभेच्छा संदेश आले होते. शिक्षण मंत्री (मध्य प्रदेश) श्री बाबासाहेब खापर्डे यांच्या अध्यक्षतेत यज्ञाचा समारोप झाला.
     एप्रिल १९४६ पवनी (भंडारा) येथे २५००० लोकांचा संघटन यज्ञ घेतला. याचा खर्च श्री. तुकाराम कारभारी या शेतकऱ्याने केला होता. 
     शोपूर येथे श्रींचे कार्य चालू असते वेळी १०० सशस्त्र मुस्लिमांनी श्रींवरती आक्रमण केले होते.  त्यांना हिंदू राष्ट्र सेनेच्या सैनिकांनी चांगलाच चोप दिला व कारावासही घडवला. 
    इंदोर राज्यातील सावेर परगण्यातील मुस्लिमांच्या तावडीतील २००० भिल्ल लोकात जागृती करून परिवर्तन केले. अकोडा, पवनी व उज्जैन येथे हिंदू संघटनेस अधिष्ठानभूत असलेल्या हनुमंत देवतेची मूर्ती स्थापन केली. चिखलदरा येथे स्वातंत्र्य देवी श्री भवानी व लोणी येथे विठ्ठल रुक्माई देवतेची मंदिर स्थापन करून सर्वांसाठी खुले केले.
   ग्वाल्हेर व खामगाव येथे हिंदू संगठन आश्रमचे ट्रस्ट करून जनतेच्या स्वाधीन केले. 
   १९४७ च्या प्रारंभी श्रींनी पिछोर (ग्वाल्हेर) येथे एक यज्ञ घेतला त्यात हजारो सशस्त्र वीर जमले होते. ६००० चे एक पथक तयार झाले होते. हे पाहून श्रींनी समाधान व्यक्त केले होते. 
  ५/४/१९४० रायपुर येथील भाषणात "भिक्षा मागून स्वातंत्र्य मिळत नसते तर ते मनगटाच्या जोरावर मिळविले पाहिजे", असे म्हणाले व पुढे हे सार्थ ठरले. 
  श्रींनी केलेल्या कार्याद्वारे भारताचे मनगट मजबूत ठरवण्यास मदत होवून,
 १५ ऑगस्ट १९४७ भारत स्वतंत्र झाला.
   पण देशाच्या विभाजनाने श्री अति दुखी झाले. श्रींनी स्थापन केलेल्या सेना दलाचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने ते सेना अधिकाऱ्यांच्या स्वाधीन केले. वरील प्रमाणे केलेल्या राष्ट्रमातेच्या सेवेने धावपळ होवून प्रकृतीवर परिणाम झाला आणि श्रींचे स्वास्थ्य खालावले गेले. या कार्यातून श्री अलिप्त होवून भिवापूर, गायमुख या विभागात अनुष्ठान करण्यासाठी काही काळ व्यतीत करत होते. त्याचवेळी श्रींना गांधी वधाची वार्ता कळली व श्री अतिदुःखी झाले.  
३१/१/१९४८ या दिवशी आर्या समाजाच्या वतीने प्रो. इंद्रदेव सिंह यांच्या निवासस्थानी झालेल्या शोक सभेत महात्माजींना महाराजांनी श्रद्धांजली अर्पण केली.
परकीयांनी महाराजांना त्रास दिला. पण आश्चर्य हे की, स्वकीयांनीपण विनाकारण  गांधी वधाच्या संदर्भात श्रींना त्रास दिला. नागपूर, रायपुर, बुलढाणा येथील कारावास व भिवपूरची स्थान बद्धता यावेळी महाराजांना सहन करावी लागली. पुढे हेबिअस कॉर्पस या कायद्याने श्रींना बिनशर्थ मुक्त केले.
महाराज २० वर्षानंतर माहेरी (मराठवाड्यात) आले. मराठवाडा स्वंतंत्र झाला होता. श्री जेथे जात तेथे लोकांचे मेळावे भरत. श्रींनी आपले जीवन विधायक कार्यांसाठी वाहून घेतले. 
श्रींच्या जन्मावेळी आलेले ते स्वामी १९४६ साली खामगावला भेट देवून गेले होते. आता पुन्हा श्रींना निरोप आला की लवकर यावे. यावेळी स्वामींचे वय १२५ वर्ष झाले होते तरी. त्यांचे त्या वयात त्रिकाळ स्नान, जप इ. चालू होते. शेकडो गावातील लोकांच्या मनामध्ये स्वामींचा आदर होता. महाराज निरोप आल्याबरोबर दत्तवाडी येथे गेले. 
शके. १९७१ पौ. शुद्ध एकादशी या दिवशी सर्व बीजासाहित सिद्ध केलेले गायत्रीचे बाढ श्रींना देण्यात आले. संस्थान संचारेश्वराच्या स्वाधीन केले गेले. महाराज व स्वामी बराच काळ एकांतात होते. ठरल्याप्रमाणे स्वामींनी श्रींच्या मांडीवर आपला देह पंतत्वात विलीन केला. 
हजारो लोक जमले. सर्वांच्या नयनात दुख:श्रु दाटले. वाडीजवळ ८ मैलावर खडका येथील गोदावरी नदीच्या पात्रात वाळूने भरलेल्या चार रांजनाशी स्वामींचा देह घट्ट आवळून गोदा माईस अर्पण (विसर्जित) केला. 
पण ...
एक महिन्यानंतर स्वामी जसे गेले होते तसेच पत्रातून वर आले. हे आश्चर्य हजारो लोकांनी स्वतः पाहीले. महाराज तेथे पोहचले. राहिलेल्या काही क्रिया पूर्ण केल्या व स्वामी पुन्हा गेले ते कायमचेच ...
असो हा गूढ विषय.
महाराजांनी दारिद्र्य, अज्ञान, विषमता, अंधश्रद्धा दूर करून सामाजिक शील जाग्रत करण्यासाठी मुक्तेश्वर आश्रमांची स्थापना केली.
श्रमदान, कृषी सेवा, ज्ञानदान, रक्तदान आदी अनेक कार्य करण्यास महाराजांनी नेहमी पुढाकार घेतला. महाराज आले की गावातील वैर, व्यसन, छळ, गुंडगिरी या गोष्टी हद्दपार होत. या गोष्टी करण्यासाठी महाराजांनी उपोषणही केले होते. डोळ्यात पाणी आणून हात जोडून श्रींनी लोकांना एकत्र आण्याचे अनेक वेळा प्रयत्न केले.
श्रींचे लहान मुलावर विशेष प्रेम होते. श्रींनी तत्व कधी सोडले नाही. व्याख्यानात विनोद व गांभीर्य सहज बोलत असत. अस्प्रश्यता, व्यसनमुक्ती, मानसिक रोग, बाधा, भुताटकी, भानामती आदी कार्य सहज केले. 
"जनशक्ती संघर्ष्यासाठी नसून जन कल्याणासाठी आहे",
 अशा प्रकारे महाराजांनी अहोरात्र गावोगावी भेट देत अनेक प्रकारचे कार्य सर्वांसोबत कधी एकटे,तर कधी वाहनात, कधी पायी, बैलगाडीत, दऱ्या खोऱ्यात फिरून आपले ध्येय सतत तेवत ठेवले.
श्रींनी सारे जीवन लोक स्तुती करोत व निंदा करोत, फुलांचा वर्षाव करोत वा शिव्यांची लाखोली वाहोत. आपले ध्येय साध्य करण्यातच पूर्ण केले.
 देव, देश आणि धर्म यासाठीच आपले संपूर्ण जीवन श्रींनी अर्पण केलेले आपणास दिसते. शेवट पर्यंत महाराज जसे जगामध्ये आले तसेच होते. म्हणजेच महाराज शेवट पर्यंत फक्त अंगावर लंगोटी नेसूनच राहिले. बस एवढीच कमाई होती.  
महाराजांचे देहावसन मुंबई येथे जे. जे. हॉस्पिटल याठिकाणी श्रावण शुद्ध एकादशी (१६/८/१९८६) या दिवशी सकाळी ७ च्या दरम्यान झाले.       
हे अल्प चरित्र सांगण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. जर यामध्ये काही चुका असतील तर त्या आमच्या असतील. 
"कुणी सांगावे की महाराजांच्या राष्ट्र धर्माचा प्रसार उद्या साऱ्या जगभर होणा नाही म्हणून !
जगात जुन्या पिढ्या जावू नव्या पिढ्या उदयास येतात. पण संत, देशभक्त, तत्वज्ञ मात्र जगाच्या इतिहासात अमर होतात" - ग. ए. तळनीकर  
"दिव्यत्वाची जेथे प्रचीती तेथे कर माझे जुळती...." 
|| जय हिंद ||

संदर्भ: भारतीय समष्टीधर्म खंड - १

ऋषिकेश रत्नपारखी, नांदेड.

5 comments:

  1. खूपच छान लेख मी पण महाराजांची च लेक आहे. जवळ जवळ 21 वर्ष त्यांचा सहवास लाभला आहे. आपला लेख वाचून अनेक गोष्टींना उजाळा मिळाला. अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपणास शुभेच्छा. आपण आणखी लिहीत राहावे ही प्रार्थना

    ReplyDelete
  2. खूप छान चरित्रलेख लिहिला आहे. आमच्या आईने पाचलेगावकर महाराजांची दीक्षा घेतली आहे. महाराज खूपच प्रेरणादायक आहेत!
    धन्यवाद

    ReplyDelete
  3. 🎓 आम्हीं पाचलेगावकर...! बरं का..!!

    देवकर कुटूंबानें दिलेला स्नेह आणि पाचलेगावकर ही ओळख सर्वधर्म समभाव आणि सहिष्णू संस्कार आम्हांस नेहमीच सार्थ अभिमान असलेली आहे मित्रांनो.

    👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

    सविस्तर लेख.. 👇🏻

    https://www.vidhyarthimitra.com/2023/11/blog-post_26.html?m=0

    ReplyDelete
  4. अतिशय तपशीलवार, रसाळ चरित्र लेखन. पूज्य श्री. महाराजांच्या तेजस्वी कार्य फार सुंदर उलगडले आहे. हृदयस्थ आभार 🙏🌹🚩 - प्रसंन् भारतीय

    ReplyDelete